निंबवडे जिल्हा परिषद गटात बॅनर फाडण्याच्या घटनेनं राजकीय वर्तुळात खळबळ
माणदेश एक्सप्रेस न्यूज/आटपाडी : निंबवडे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याची तयारी करणाऱ्या साध्य फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा विद्याताई मोटे यांच्या दीपावली निमित्त शुभेच्छा देण्यासाठी पडळकरवाडी येथे लावण्यात आलेले डिजिटल बॅनर अज्ञातांनी फाडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या विद्याताई मोटे यांनी अलीकडेच निंबवडे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दाखल करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या उमेदवारीच्या चर्चेनेच विरोधक हवालदिल झाल्याची प्रतिक्रिया त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.
अज्ञातांनी फाडलेले बॅनर हे दीपावली शुभेच्छा संदेशाचे होते. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि समर्थकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला आहे. “आमचं काम, आमचं विचारधन आणि जनतेचा विश्वास फाडून चालत नाही... कारण पोस्टर फाटलं तरी जनतेच्या मनातील जागा कधीच फाडता येत नाही!” असे त्यांच्या समर्थकाकडून सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केल्या जात आहेत.
या घटनेचा निषेध साध्य फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनीही केला असून, “लोकशाहीच्या मैदानात विचारांना उत्तर विचारांनी द्यावं, अशा प्रकारच्या कृतींनी नाही,” अशी भूमिका अनेकांनी मांडली आहे. दरम्यान, बॅनर फाडण्यामागे नेमकं कोणाचं हात आहे, याचा तपास स्थानिक प्रशासनाने घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
📍महत्वाचे मुद्दे :
निंबवडे गटात विद्याताई मोटे यांच्या उमेदवारीची चर्चा जोरात.
दीपावली शुभेच्छा बॅनर अज्ञातांनी फाडल्याची घटना.
समर्थकांचा निषेध व भावनिक प्रतिक्रिया.
घटनेच्या चौकशीची मागणी.