For the best experience, open
https://m.mandeshexpress.page
on your mobile browser.

विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर वज्रलेप होणार, पुरातत्व विभागाच्या अहवालानुसार निर्णय

12:07 PM Mar 12, 2025 IST | Admin@Master
विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर वज्रलेप होणार  पुरातत्व विभागाच्या अहवालानुसार निर्णय
Advertisement

माणदेश एक्सप्रेस/पंढरपूर : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या सावळ्या विठुराया आणि रुक्मिणीमातेच्या मूर्तीचे वज्रलेप करण्यात येणार आहे. पुरातत्व विभागाच्या रासायनिक विभागाने मूर्तीची पाहणी केली. त्यांच्या अहवालानुसार वज्रलेप करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. आषाढी यात्रेपूर्वी हा वज्रलेप करण्यात येईल. या पूर्वी देवाच्या मूर्तीला चार वेळा वज्रलेप करण्यात आला होता.

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी वर्षभरातून साधारणपणे सव्वा ते दीड कोटी भाविक मूर्तीच्या चरणावर मस्तक ठेवून दर्शन घेतात. ही स्वयंभू मूर्ती वालुकाशम दगडाची आहे. अनेक वर्षांपासून मूर्तीवर झालेल्या महापुजांमुळे मूर्तीची झीज झपाट्याने होत गेली. २००९ पासून या महापूजा बंद करण्यात आल्या. मात्र, मूर्तीचे संवर्धन व्हावे झीज होऊ नये म्हणून पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार विठ्ठलाच्या मूर्तीला वज्रलेप करण्याचा निर्णय घेतला. १९ फेब्रुवारी१९८८ साली मूर्तीवर पहिल्यांदा ॲपॉक्सीचा लेप देण्यात आला होता. यानंतर २४ मार्च २००५ आणि शेवटची प्रक्रिया १८ ते २० मार्च २०१२ मध्ये वज्रलेप करण्यात आला होता. तर करोना काळात म्हणजे २३ जून २०२३ रोजी चौथ्यांदा वज्रलेप केला. वास्तविक पाहता दर पाच वर्षांनी लेप द्यावा, अशा सूचना पुरातत्व विभागाच्या आहेत.

Advertisement

या बाबत पुरातत्व विभागातील रासायनिक विभागाचे तज्ज्ञ मंडळींनी येथील मंदिरातील दोन्ही मूर्तींची पाहणी केली. त्या बाबतचा अहवाल मंदिर समितीला दिला. त्यानुसार वज्रलेप करण्यात येणार आहे. मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय घेवून पुढे विधी व न्याय खात्याकडे मूर्तीस वज्रलेप करण्याची परवानगी मागण्यात येईल. पुरातत्व विभागाच्या निकषानुसार हा वज्रलेप करण्यात येईल, अशी माहिती शेळके यांनी दिली आहे. सद्यस्थितीला विठ्ठल आणि रखुमाईची पायाची झीज झाली आहे. त्याच बरोबरीने मूर्तीचे संवर्धन व आयुर्मान वाढविण्यासाठी वज्रलेप करण्याची सूचना पुरातत्व विभागाने दिली आहे. आषाढी यात्रेपूर्वी वज्रलेप करण्याचे नियोजन मंदिर समितीचे आहे.

Tags :