ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

आतापर्यंत 80 लाख महिलांच्या बँक खात्यावर राज्य सरकारने 3000 रुपये पोच

03:34 PM Aug 16, 2024 IST | Mandesh Express

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिलांच्या बँक खात्याता पैसे जमा केले जात आहेत. आतापर्यंत 80 लाख महिलांच्या बँक खात्यावर राज्य सरकारने 3000 रुपये पाठवले आहेत. असे असतानाच सरकारने आणखी 16 लाख पात्र महिलांना या योजनेअंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी दिला आहे. तशी माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

आदिती तटकरे काय म्हणाल्या?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज सकाळपासून 16 लाख 35 हजार भगिनींच्या खात्यात 3000 रुपये लाभ जमा झाला आहे. त्यापूर्वी 80 लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले होते. सद्यस्थितीत एकूण 96 लाख 35 हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. तसेच उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे, असे त्यांनी सांगितले.

15 ऑगस्ट रोजी 48 लाख महिलांना लाभ
याआधी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस 14 ऑगस्ट रोजी 32 लाख महिलांना तर 15 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजता 48 लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित करण्यात आला. ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी महिला व बालविकास विभाग 24 तास कार्यरत असून या प्रक्रियेवर मी स्वतः लक्ष ठेवून आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले होते. 31 जुलैपर्यंत अर्ज मंजूर झालेल्या महिलांच्या बँक खात्यावर सध्या 3000 रुपये जमा केले जाणार आहेत. नंतर हळूहळू सर्व महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवले जातील.

योजनेची अंतिम तारीख काय?
दरम्यान, या योजनेसाठी फक्त 31 ऑगस्टपर्यंतच अर्ज करता येतील, असे सांगितले जात होते. पण आदिती तटकरे यांनी याआधीच स्पष्ट केल्याप्रमाणे या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख नाही. अर्ज करण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहील. त्यामुळे 31 ऑगस्टनंतरही महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे.

Tags :
आदिती तटकरेमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Next Article