तीन वाटाची माती, (सुरतगुवाहाटीगोवा), लिंबू मिरची, काळी बाहुली, नाही फरक पडला तर EDचा X-ray काढून बघा..!! एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेकडून टीका
माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता आठ दिवस झालेले असताना राज्याचे मुख्यमंत्री कोण असणार? हे अद्यापपर्यंत महायुतीकडून ठरलेले नाही. असे असतानाच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातील दरेगाव या त्यांच्या मूळगावी गेलेले आहेत. शिवाय एकनाथ शिंदे आजारी असल्याची माहिती आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. शिंदेंना बाहिरवसा झाला असलं, त्यामुळे एखादं मुख्यमंत्रिपद, गृहमंत्रिपद उतरून टाका…!, अशा शब्दात अंधारे यांनी शिंदेंना टोला लगावला आहे.
सातारा जिल्ह्यातील दरेगाव हे मुख्यमंत्री एकनाथी शिंदे यांचे मुळगाव आहे. त्यांची प्रकृती बरी नसल्याने, ते दरेगाव या ठिकाणी विश्रांती घेत आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी डॉक्टरांचं पथक दरेगावात तळ ठोकून आहे. तब्येत ठीक नसल्याने कुणालाही एकनाथ शिंदे यांना भेटण्याची परवानगी नाही. यावरूनच शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टोला लगावला आहे. त्यांच्यावरून मुख्यमंत्रिपद, गृहमंत्रिपद उतरून टाका, असं अंधारे म्हणाल्या आहेत.
सुषमा अंधारे यांचे ट्विट
ताप हाय का..ताप हाय का असं म्हणून नुसताच गाव गोळा काय करताय? बाहिरवसा झाला असंल. तीन वाटाची माती, (सुरतगुवाहाटीगोवा), लिंबू मिरची, काळी बाहुली, उलट्या पखाचं कोंबडं आणि जमलंच तर एखादं मुख्यमंत्रीपद/गृहमंत्रीपद उतरून टाका..! नाही फरक पडला तर EDचा X-ray काढून बघा..!!
महायुतीला तब्बल 230 जागा मिळाल्या आहेत. पण नवं सरकार अद्यापपर्यंत स्थापन झालेलं नाही. त्यामागे काही कारणं आहेत, यातील प्रमुख कारण म्हणजे, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद हवं आहे. जर मुख्यमंत्रिपद नसेल तर मग गृहखातं शिंदेंना त्यांच्याकडे हवं आहे. यावरून महायुतीत अद्यापपर्यंत खल सुरु आहे. ही सगळी पार्श्वभूमी असताना एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावात आहेत.