👉 “‘२३० कोटी शुभेच्छा!’ – धंगेकरांची मोहोळांना ‘पुणेरी’ वाढदिवस भेट” ; धंगेकरांचा हॅशटॅग चर्चेत
पुणे, दि. ९ (प्रतिनिधी): केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव झाला. मात्र, विरोधक माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिलेल्या ‘पुणेरी स्टाईल’ शुभेच्छांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
धंगेकर यांनी सोशल मीडियावरून “हॅप्पी बर्थडे बर का...! वाढदिवसाच्या २३० कोटी शुभेच्छा! जय जिनेंद्र!” असा टोला लगावणारा पोस्ट करत नाव न घेता मुरलीधर मोहोळ यांच्यावर अप्रत्यक्ष प्रहार केला. त्यांचा हा हॅशटॅग — #HappyBirthdayBarKa #230CroreShubhechha #JayJinendra — सध्या पुण्यात सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
ही शुभेच्छा सामान्य वाटली असती, पण यामागचा संदर्भ पाहता ती राजकीय टोमणा म्हणून घेतली जात आहे. कारण काही महिन्यांपूर्वी पुण्यातील जैन समाजाच्या जागेच्या व्यवहारावरून मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. त्या प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीच आवाज उठवला होता आणि त्यांनी या प्रकरणात सातत्याने पाठपुरावा केला होता.
धंगेकर यांच्या दबावामुळे अखेर वादग्रस्त व्यवहार रद्द करण्यात आला. त्यामुळे हे प्रकरण धंगेकर यांचे राजकीय यश आणि मोहोळ यांचे अपयश म्हणून पाहिले गेले. त्यामुळेच वाढदिवसाच्या निमित्ताने “२३० कोटी शुभेच्छा” या उल्लेखातून धंगेकर यांनी या जुन्या प्रकरणाची आठवण जिवंत ठेवत पुन्हा एकदा राजकीय चिमटा काढला आहे.
मोहोळ यांच्या समर्थकांनी मात्र या शुभेच्छांकडे दुर्लक्ष करत सोशल मीडियावर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, धंगेकर यांचा ‘पुणेरी’ अंदाज आणि त्यांची उपरोधिक भाषा सोशल मीडियावर लोकांमध्ये चांगलीच गाजत आहे.