भारतीय अर्थव्यवस्था 2027 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल; गीता गोपीनाथ यांचा दावा
भारताची आर्थिक वाढ अपेक्षेपेक्षा चांगली झाली आहे. भारत 2027 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (Economy) बनेल, असा दावा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. गीता गोपीनाथ (Dr. Gita Gopinath) यांनी केला आहे. इंडिया टुडेचे वृत्तसंचालक राहुल कंवल यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान गीता गोपीनाथ यांनी ही भविष्यवाणी केली. यावेळी गोपीनाथ यांनी सांगितले की, विविध घटकांमुळे भारताची आर्थिक वाढ अपेक्षेपेक्षा चांगली झाली आहे. भारताच्या वाढीने गेल्या आर्थिक वर्षात आमच्या अपेक्षेपेक्षा खूप चांगली कामगिरी केली आहे. या सर्वाचा परिणामांमुळे आमच्या या वर्षाच्या अंदाजावर होत आहे.
डॉ. गीता गोपीनाथ यांनी पुढे बोलताना सांगितलं की, FMCG आणि दुचाकी विक्रीसाठी नवीन डेटा आणि अनुकूल मान्सूनच्या आधारे, IMF ने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा विकास अंदाज 7% पर्यंत वाढवला आहे. केंद्र सरकारने आर्थिक सर्वेक्षणात दिलेल्या 6.5% अंदाजापेक्षा ही अधिक तेजी आहे. IMF ने भाकीत केले आहे की, 2027 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल.
गेल्या वर्षी खाजगी खपाची वाढ सुमारे 4% होती. ग्रामीण उपभोगातील पुनर्प्राप्तीमुळे आम्ही ती वाढण्याची अपेक्षा करतो. ग्रामीण उपभोगात रिकव्हरी दिसली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असंही गीता गोपीनाथ यांनी सांगितलं. तसेच यावेळी त्यांनी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या वाढीचा अंदाज 7% करण्यामागील कारण स्पष्ट केले.
गीता गोपीनाथ यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत दिलेला अंदाज गेल्या महिन्यात भारत सरकारने अर्थसंकल्पात मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षणात मांडलेल्या अंदाजापेक्षा जास्त आहे. भारत सरकारने जीडीपी वाढीचा अंदाज 6.5 टक्के ठेवला आहे. तर आता IMF ने GDP वाढीचा अंदाज 7 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. गीता गोपीनाथ यांनी या अंदाजाच्या आधारे सांगितले की, 2027 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.
गीता गोपीनाथ IMF मध्ये सामील होण्यापूर्वी आशियाई विकास बँकेने (ADB) भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक केले होते. आशियाई विकास बँकेने (ADB) भारताचा GDP अंदाज 7 टक्के ठेवला आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने चालू आर्थिक वर्षात GDP वाढीचा दर 7.2 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
पहा व्हिडिओ -