नगराध्यक्षपदासाठी डॉ. सप्तेश जाधव यांना संधी द्या! शिवसेनेकडे समर्थकांची मागणी
माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून सुप्रसिद्ध सर्जन डॉ. सप्तेश मधुकर जाधव (माळी) यांना नगराध्यक्षपदाची संधी द्यावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून जोर धरू लागली आहे. रुग्णसेवेतून जनसेवेचा सेतू बांधणारे, उच्चशिक्षित, लोकाभिमुख व सर्वसमावेशक दृष्टीकोन असलेले डॉ. जाधव हे विकासाचा नवा अध्याय लिहू शकतील, असा विश्वास नागरिकांमध्ये दिसून येतो.
एम. एन. जाधव सर हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्यसेवेच्या क्षेत्रात ठसा उमटविणारे डॉ. जाधव यांनी वैद्यकीय व्यवसायाला सेवावृत्तीची जोड दिली. गोरगरिबांसाठी अनेक आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, मोफत तपासणी शिबिरे राबवत त्यांनी समाजसेवेला नवा आयाम दिला आहे. वडील कै. मधुकर जाधव यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची परंपरा जपत, त्यांनी अत्यंत कमी काळात लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे.
सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्यासह दोन पिढ्यांचा राजकीय व सामाजिक स्नेह जपणारे जाधव-माळी कुटुंब हे आटपाडीतील लोकसेवेसाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्याच परंपरेतून प्रेरणा घेत, डॉ. जाधव यांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेत काम करण्याचा ध्यास घेतला आहे.
शहराच्या विकासासाठी, तसेच स्व. अनिल बाबर आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या विकासगतीला पुढे नेण्यासाठी डॉ. जाधव सक्षम पर्याय ठरतील, असा सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे. युवा वर्ग आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत असून, त्यांच्या उमेदवारीकडे “सकारात्मक बदलाचे प्रतीक” म्हणून पाहिले जात आहे.
आरोग्यदूत म्हणून ओळख असलेले डॉ. सप्तेश जाधव हे आज गोरगरिबांच्या सेवेसाठी झटणारे, लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय शोधणारे संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे नागरिकांमधूनच त्यांच्या उमेदवारीची मागणी पुढे आली असून, शिवसेना नेते तानाजीराव पाटील यांनी या मागणीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेनेकडून जर डॉ. जाधव यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली, तर आटपाडी नगरपंचायतीचा लौकिक जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात वाढेल, असा विश्वास जनतेत व्यक्त होत आहे.