ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अजित पवार यांचे मौन?

12:12 PM Dec 31, 2024 IST | Admin@Master

मुंबई : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राष्ट्रवादीचे स्थानिक नेते व अन्न आणि नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून काहीच प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

देशमुख हत्येप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. बीडमधील हत्येचे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पडसाद उमटले होते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी बीडमध्ये जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतल होती. या प्रकरणातील सूत्रधारांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला होता. गेला आठवडाभर धनंजय मुंडे यांच्या विरोधात कारवाईची मागणी होत आहे. पण यावर अजित पवारांकडून काहीच प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. अजित पवार सध्या आहेत कुठे, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. बहुधा अजित पवार हे परदेशात गेल्याची चर्चा आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर विविध राजकीय पक्षांकडून आरोप होत आहेत. तसेच राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सोनावणे यांची सीआयडीकडून सखोल चौकशी करण्यात आली. आपण राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असल्याने चौकशी झाल्याचा दावा सोनावणे यांनी केला. मुंडे यांच्यावर आरोप होत असतानाच युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची चौकशी झाल्याने राष्ट्रवादीबद्दल संशय निर्माण झाला आहे.
बीडमधील गुंडगिरी तसेच देशमुख हत्या प्रकरण धसास लावण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुढाकार घेतल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. त्यातच भाजप आमदार सुरेश धस यांनीही राष्ट्रवादीची कोंडी केली आहे.

Tags :
Ajit Pawar silenceSarpanch Santosh Deshmukh murder case
Next Article